प्रतिनिधी : रमेश पंडित
पिंपरी-चिंचवड : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारल्यांच चित्र आहे. लोकसभेनंतर आता अवघ्या काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक जणांची घरवापसी होत असल्याचं चित्र आहे. पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी आहे, पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 16 नगरसेवकांनी शनिवारी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान आज पुन्हा एकदा विलास लांडेंच्या उपस्थितीमध्ये हे सर्व जण शरद पवार यांना भेटणार आहेत. पाच जुलै रोजी त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे
दरम्यान या नगरसेवकांच्या भेटीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे, हल्ली मला रोज दोन तीन तास काढावे लागतात नवीन लोकं पक्षात येणारे आहेत, त्यांना भेटायला. नगरसेवकांनी आमची भेट घेतली. जे येणार आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो. नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.